विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

गुरुवार, २१ जुलै, २०११

जगण्याचा हावरटपणा








{ Blog Post # 8 }



हा लेख भा. पो. प्रकारात मोडतो. 'काय म्हंटलंय' आणि 'नेमकं काय म्हणायचंय' यातली तफावत कमी करण्याचे प्रयत्न तोकडे ठरण्याची शक्यता आहे.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' (खरंतर, या संहितेचं शीर्षक 'आज जीलो, कल किसने देखा' वगैरे हवं होतं, असो. गोंडस 'मार्केटिंग' ! ) तर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, 'कल हो ना हो' अशा संकल्पना आपल्याला का आकर्षित करतात? 'आज जगून घ्या, उद्या कुणी पाह्यलाय?' असा उरका का सुचतो? आता अशा चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर जुनं, गुमनाम मधलं लताचं गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. मृत्युच्या छायेत, हेलन मनस्वी आनंदाचे गाणे गाऊ लागते.. 'जो करना हो आजही करलो, कलको किसने देखा? आयी हैं रंगीन बहारे, लेके दिन रंगीले!' ...

मी निव्वळ चित्रपटांबद्दल बोलत नाहीये. चित्रपटांचे विषय 'तत्सम' असतीलही, पण एकूणच 'समीक्षा' वगैरे लिहून मला त्यातल्या उरल्यासुरल्या (खरोखर) सुंदर गोष्टींना तोलायचं नाहीये. 'या' आणि 'अशा' गोष्टी साहित्य, सिनेमात प्रासंगिक असल्यातरी त्यांचे ठसे विनासंदर्भ उमटत राहिले आहेत. 'उद्या असू-नसू, आज जगून घ्या', 'आयुष्यात आपण सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, काय?', 'कसंय, उगाच काही राहून जायला नको' अशी केविलवाणी वाक्यं असुरक्षित आत्मकेंद्री मनाची प्रतिबिंब आहेत. 'सगळं' जगण्याचा हावरटपणा आहे तसा तो 'सगळं आजच' जगण्याचा सुद्धा आहे!

आयुष्य ही आपण विचारपूर्वक टाकलेली पावलं असून, जगात उपलब्ध सर्वच गोष्टींच्या रुळांवरून धावणारी गाडी नाही, हे मान्य होणं कठीण आहे. कारण, जे काही 'आजच करून घेऊ' या यादीत लिहलं जातंय त्यातलं बव्हंशी फक्त स्वार्थातून घडलंय, बऱ्याचशा गोष्टी केवळ स्वतःसाठी हव्याशा आहेत...तुम्ही म्हणाल, त्यात गैर ते काय? पण स्वतःचं सुख आड आलं की विचार खुंटणार ना?

आपण ढोबळ उदाहरणांवरून जाऊ. ती ढोबळच आहेत, पण कदाचित 'म्हणणे' उलगडेल-

जिंदगी.. या चित्रपटात व्यापाराशी संबंधित यशस्वी नायक आपल्याला स्वयंपाक आवडतो आणि चाळीशीनंतर आरामशीर तेच करणार अशी मनीषा बोलून दाखवतो. त्यावर नायिका विचारते, 'तू चाळीशीनंतर जिवंत असशीलच कशावरून?' ...चित्रपटाचे जाऊ दे. मुळातच ते माध्यम ' larger than life' आहे. पण प्रेक्षागृहात अस्पष्ट 'हंss' ऐकू येतो. जरा गप्पा कानावर पडत असतील तर लक्षात येईल, असा स्निग्धता हरवलेला प्रश्न बऱ्याच लोकांना चक्क पटतो!

काही दिवसांपूर्वी एका स्नेह्यांनी आपण आपल्या मुलाला स्वतःहून कसे दारूचे वेगवेगळे प्रकार पाजले हे अभिमानाने सांगितलं. (उत्तेजक पेय हा इथे विषय नाही!) त्यांचा होरा असा की, "इतर कुणाच्या प्रभावाला बळी पडण्यापेक्षा वडलांनीच मैत्रीपूर्ण पुढाकार घ्यावा". मी सवयीप्रमाणे उगाच म्हंटल, "चांगलंय, कुणाच्याही प्रभावाला बळी पडणाऱ्या दुबळ्या मुलांना असंच सांभाळून घ्यावं" न उमजून त्यांनी पुढचा मुद्दा मांडला, "आयुष्यात सगळं माहित हवं, चव हवी. मग भले निर्णय आपल्या हातात असुदेत!" मी काहीच बोललो नाही. उलट, "वाह, हे छान!" म्हणून मोकळा झालो. प्रशंसाप्रिय श्रोत्यांशी असंच बोलावं लागतं. नाहीतर म्हंटल असतं, "छानच आहे तुमचं! मग कशाकशाची चव घेतलीत? पुण्यात आलेच आहात तर बुधवार पेठेतही जाऊन या. कोंढवा-कॅम्पच्या भागात काही चवी टोचून मिळतात असं ऐकलंय, तिथेही जाऊन या. काय आहे, काही राहून जायला नको!" अशा लोकांना कधी 'कुणाला मदत करायची राहून जायला नको' , 'कुणाचं दुखावलेलं मन सावरायचं राहून जायला नको', 'निष्काम प्रेम राहून जायला नको' असं वाटत असेल का?

अनुभव आणि उपभोग यात फरक आहे.

'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमात मोहन आगाशेंनी या आत्मकेंद्री वृत्तीवर सडकून टीका केली. अजूनही आपल्या आजी-आजोबांच्या पिढीतली लोकं माणूस समोर दिसल्यावर 'आपण ह्याच्यासाठी काय करू शकू?' असा विचार करतात. 'आपल्याला ह्याचा काय उपयोग होईल' असा नाही. एव्हरेस्ट सर करणारा एडमंडसुद्धा म्हणतो की शिखर सर केल्यावर मिळालेल्या आनंदापेक्षा उत्तरार्धात शेर्पा समाजासाठी केलेलं काम त्याला खरा आनंद देऊ शकलं

आपण उपभोग घेता घेता आनंद घेणं विसरलोय का?

यावर कुणी अशाश्वत जगण्याचं उदाहरण देईल. दारी अचानक उभ्या मरणानं हवालदिल होणाऱ्या माणसाला 'निव्वळ उपभोगाचा उरका' ही संधी वाटू शकेलही. मात्र अशा संकटाच्या शक्यतेचे गणित मांडून पहा. फोलपणा लक्षात येईल.

प्रत्येक वयाचं, प्रत्येक क्षणाचं सौंदर्य स्वतंत्र आहे.
चांगलं-वाईट, नीतीमूल्य या गोष्टी 'आपल्या' आहेत.
आपण 'निर्णयक्षम' प्राणी आहोत.
आपल्याला भावना आणि बुद्धी लाभली आहे.
जगण्यासाठी धावताना खरं-जगणंच विसरणं जसं मूर्खपणाचं भासतं, तसंच ते आज-आत्ता उपभोगण्यासाठी अगतिक होणंही अनैसर्गिक आहे.
ताठ मानेनं आरशाकडे पाहत आपण स्वतःला वर्तमान प्रतिमेत शोधणं हेच प्रतिभेच्या विश्वातलं पहिलं पाऊल आहे.
प्रत्येक क्षण आनंदानं जगायचाच आहे, पण फक्त वर्तमान क्षण! सगळ्या प्रकारचं सगळं जगणं एकत्र खेचण्याचा प्रयत्न हा हावरटपणाच आहे!


***** **** *** ** *
 उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा! मला twitter वर देखील follow करू शकता.. उजवीकडे 'about me ' पहा!


२ टिप्पण्या:

Deepika Ranade म्हणाले...

shrikant..baryach goshti patalya, agdi swa-manatlya ch asavyat ashya.."bhapo" :)
pan मुलाला स्वतःहून कसे दारूचे वेगवेगळे प्रकार पाजले yavar cha tuza mat matra thoda khatakla mitra..

Unknown म्हणाले...

@Deepika-

धन्यवाद ! मनापासून :)

कधी-कधी लिहिण्याच्या भरात चुकीची उदाहरणं किंवा योग्य उदाहरणं चुकीच्या पद्धतीने दिली जातात.. मलाही ते 'तसं' खटकलं अगदी नक्कीच, पण उमटलेलं तसंच राहू दिलं- हाच ब्लॉग आणि प्रत्यक्ष लिखाणातला फरक असावा, नाही का?

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected