विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

समारोप (शेवटचा लेख){ Blog Post # 16 }घरात आरसा लावण्यामागे साधारण काय उद्देश असतो? "आपण कसे दिसतो हे दुसऱ्याने पाहण्याआधीच आपल्याला कळावे, सावरता यावे आणि हसे टळून कौतुकाच्या आशेने आणि आत्मविश्वासाने कुणाहीसमोर जाता यावे!" अर्थात, आरसा बसवताना कोणतीही गृहिणी (किंवा होतकरू गृहस्थ म्हणूया हवं तर) हा विचार करत नाही. तिथे आरसा असणं ही गरज असते! त्यावर विचार करायला वेळ असला तरी ती गरज टळणार नसते! नेमके तेच हा लेख लिहिताना जाणवते आहे. आजवर जवळपास सोळा लेख प्रकाशित झाल्यानंतर तथाकथित समीक्षण करणे ही माझीच गरज झाली आहे. अर्थात समीक्षण बाजूला राहून या लेखाला गोषवाऱ्याचेच स्वरूप आले आहे. गत्यंतर नाही. मात्र एवढे नक्की की, हा गोषवारा समारोपाचा आहे. आमची ब्लॉगवरील जाहीर वटवट आम्ही थांबवत आहोत! आज या ब्लॉगला नऊमहिने पूर्ण होत आहेत. नऊ महिने, सोळा लेख, साठहून अधिक नोंदणीकृत सदस्य आणि हजारो वाचक- कोषातून बाहेर येण्यासाठी ही जमवाजमव पुरेशी भासते आहे... "ब्लॉग पूर्णतः नव्याने सुरु करावा, नव्या प्रकारचे लेख लिहावेत आणि वाचकांना अधिकाधिक सामावून घ्यावे" असा पूर्वी विचार होता. तसे सदस्यांना कळवलेही गेले, बऱ्याच जणांनी संमिश्र प्रतिसादही दिला. धन्यवाद!

मात्र, हा ब्लॉग थांबवण्याचा निर्णयसुद्धा विचारपूर्वक घेतोय आणि वाचकांना कारणे देण्यास मी बांधील आहे. तर...

 • अखेर होताना ती साजरी व्हावी असे माझे मत आहे. कोणतीही वैयक्तिक प्रसिद्धी नसताना, केवळ काही शब्दांच्या आणि भावांच्या जोरावर हा ब्लॉग भारतासह युरोप, अमेरिका, आशिया येथील वाचकांपर्यंत पोहचला. केवळ पोहचला नाही तर, नियमित वाचला गेला. कुणाला आवडला, कुणी नावं ठेवली. कुणी स्थितप्रज्ञ होऊन तो वाचला आणि काहींनी चक्क चोरण्याचाही मनसुबा बोलून दाखवला...ही बिनभांडवली लोकप्रियता सुखावून गेली. मग वाटलं, हे आहे तोवर आनंदाने निरोप घेता येईल! जेंव्हा अनपेक्षितरीत्या कृतकृत्य वगैरे वाटू लागतं, 'भाव वधारतो' तेंव्हाच आनंदाने निरोप घेणं कधीही चांगलं! वेदनाहीन, समाधानकारक शेवट!
 • दुसरा विचार असा की, मराठी ब्लॉगवर लिहणं जिकिरीचं आहे. तो टिकवणं त्याहून कठीण. वेळेची आणि ऊर्जेची ही प्रचंड गुंतवणूक कधीकधी सृजनाच्याच आड येते. म्हणजे, उदा. आज मला काही छान सुचलंय, प्रासंगिक आहे, मी ते आज लिहिणार आणि ब्लॉगवर प्रसिद्ध करणार यासाठी बराच वेळ काढावा लागतो आणि त्या संगणनात अजून काही सुचण्याची, आहे ते सुधारण्याची ऊर्जा कमी होत जाते. ही तक्रार नाही, केवळ अनुभव म्हणून सांगतो. सतत आभासी जगाशी ''लिहितं आणि जोडलेलं" राहून बाहेरचं सुंदर जग निरखून पाहता येणं अवघड आहे.
 • मराठीतून लिहिताना बऱ्याचदा लोकांचा माझ्या वयाबद्दल किंवा आभासी पोक्तपणाबद्दल विलक्षण गैरसमज होऊ लागला. हा दोष नाही, ही गंमत आहे. विशुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करणं हे आपल्याकडे विनोदाने, थट्टेने पाहिलं जातं. बऱ्याचजणांचा 'मराठी म्हणजे सखाराम गटणेशैलीचीच' असा विचित्र गैरसमज झाला आहे. हा अनुभव मलाही अधून मधून आला. मराठीचा ''आव" आणणारे आणि जे इंग्रजी शब्द मराठीत घडलेच नाहीत (बरेच आहेत असे) ते ओढून ताणून कोडी घालून कोंबणारे, नको इतके भाषांतर करणारे महाभागही भेटले. भाषा फुलवण्यासाठी तिचा स्वभाव लक्षात यायला हवा, बाहेरील शब्दांनी ती समृद्धच होत जाते- पण तिची शैली बिघडता कामा नये.... तुम्ही रेडीओ आणि टीव्ही सिरीयल मधील मराठी ऐकत असाल, प्रमाण मानत असाल तर ते आत्ताच थांबवा. हिंदी-इंग्रजीचे  वाक्यागणिक रुपांतर करून त्यांनी मराठी कान दुषित केले आहेत. भाषा आणि भाषाशैली या अनुषंगाने एक लेखही जमून आला होता. पण त्यातील काही भाग पूर्णतः मी लिहिलेला नव्हता- त्यामुळे तो प्रकाशित करता आला नाही. असो, पण मराठीचे असे थट्टेखोर अवमूल्यन आणि दुसऱ्या टोकाला कर्मठ आग्रह या कात्रीत सापडण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. अर्थातच, वाचकांना न दुखावता काढता पाय घेणं ही माझी गरज बनली.
 • चौथं आणि महत्वाचं कारण असं की ब्लॉग लिहू लागल्यावर लेखनातून संवाद जसा अधिकाधिक सुंदर होत जातो तसाच तो एकांगी होत जातो. अशाप्रकारे संवाद साधण्याची सवय वाढीस लागली की तिचे दुष्परिणामही होऊ लागतात. चांगलं लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी अधिकाधिक चांगलं ऐकण्या-वाचण्यासाठी सवड तर हवीच पण दृष्टीकोनही तसाच हवा. आत्ताच भरभरून लिहिण्याएवढा मी मोठा नाही. जे आहे त्याचे थोडेफार कौतुक झाले असले तरी हुरळून जाण्याच्या आतच लगाम बरा. म्हणून निदान आत्ता हे थांबवणं रास्त आहे.

 • मग मी ब्लॉग लिहिणारच नाही का? जे नियमित वाचतात, वाचण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावे?
  • ब्लॉग वाचणाऱ्यांचे आभार! मी आता हा ब्लॉग लिहिणार नाही. पुढे कधी नवीन लिहिलाच तर ज्यांनी आपला ईमेल पत्ता कळवला आहे किंवा जे Google+, Facebook, Twitter वापरून जोडले गेले आहेत त्यांना कळवण्यात येईल.
  • हा ब्लॉग सध्या आहे त्या अवस्थेत उरेल.
 • नवीन ब्लॉगबद्दल-
  • कदाचित पुढीलवर्षी नाताळाच्या दिवसांमध्ये तो प्रसिद्ध होईल. मराठीतून टंकलेखन फारच वेळखाऊ आहे आणि मराठी वाचकांचे अवकाशही मर्यादित आहे- हे वास्तव आहे. नवीन ब्लॉग, जर लिहिलाच, तर इंग्रजीत लिहिला जाईल. 
आता पुन्हा आपल्या ''गोषवाऱ्याकडे"...

मग, आपल्याच लेखांवर टीका लिहून काय साधणार आहे? मोठेपणा! छे छे, ते अशक्य आहे. मी काही स्वतःच्याच साहित्याची समीक्षा करणारे राजन खान नाही. त्या उंचीच्या तुलनेत मी गिनीज बुकात नोंदवण्या इतपत बुटका ठरेन! तर, उद्देश असा की, निदान हे सगळे काय आहे याचा आढावा घेता येईल.

ब्लॉग लिहणं सुरु केल्यापासून सर्वांत आनंददायक गोष्ट अशी घडली की ''आपण अगदीच रिकामटेकडे नाही" ही जाणीव झाली. बापुड्याला कॉलर ताठ करायला हे पुरेसे असते. नवीन नवीन लिहिण्यासाठी उत्साह असूनही वेळ मिळत नाही ही तक्रार नक्कीच सुखावून गेली. एकंदर, आपण दिवसभर बरेच काही करत असतो हे ठसले. माझ्या मते, कोणत्याही आळशी माणसाने ब्लॉग लिहिणे सुरु करावे. आत्मविश्वास वाढवण्याचा सोपा मार्ग!

दुसऱ्याच लेखात अक्कल पाजळली होती. (या गोष्टींना प्रसंगानुरूप असेच संबोधावे लागते!) या लेखाचे कौतुक झाले आणि सकाळ मध्ये तो प्रसिद्ध देखील झाला. उड्या मारणार तेवढ्यात जाणवले की लेखात लिहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणणं म्हणजे तीर्थंकराच्या वाटेवरची पावलं आहेत. हे अवघड आहे. सुदैवाने, पळपुटेपणा माहीतच नसल्याने प्रामाणिक राहण्याची शिकस्त सुरु झाली. आजतागायत इथे प्रसिद्ध लेख हे त्या ''का काय आणि निमित्ताशी" मेळ राखून आहेत. अपवाद सापडल्यास जरूर सांगावा!

दुसऱ्या लेखात आणि मग अधून मधून प्रत्येक लेखात घडलेली चूक- एकदा पराग खैरनार नावाच्या बुद्धिमान वाचकाने लक्षात आणून दिली. त्याचा मी आभारी आहे. मराठीपण हे पुणेरीपणाच्या जवळ गेलं की उगाच अपमान करण्याची सवय लागते. ही सवय, विनोद बाजूला ठेवा, अत्यंत वाईट असते. नकळत, वाचकांना कमी लेखणारी विधानं करून मीही त्या सवयीच्या जवळ फिरकलो. वेळीच सावध होता आलं, हे बरं!

ओंकार देशमुख या मित्राने अश्लील शब्द हा लेख प्रसिद्ध करण्यास हिरवा झेंडा दाखवला. या लेखातील 'माहिती' ही आमच्याच गप्पांचा परिपाक होती. ब्लॉगरच्या आकडेवारीनुसार हा लेख अजूनही लोकप्रिय आहे, आणि अद्याप सर्वाधिक वाचक याच लेखाला लाभले आहेत. या लेखाने मला तथाकथित धाडसी लिहिण्याचे परिणाम दाखवले. लैंगिकतेसारख्या, अन्नाइतक्याच मुलभूत गोष्टीचे अप्रूप आणि विकृत झालेले रूप प्रकर्षाने जाणवले. मेघना पेठेंसारखी लेखिका पुरुषाच्या(सुद्धा) वैयक्तिक आयुष्याबद्दल सहजपणे लिहू शकते, आणि ते मूळसाहित्याशी कोणतीही तडजोड न करता! या गोष्टीचे कौतुक होतेच, त्यातले अवघडलेपण समजले. सत्य ही कित्ती कोंडलेली गोष्ट असू शकते याची जाणीव झाली. आणि ''आपण( म्हणजे आपण सगळे) ते तितके सहज लिहू-बोलू शकत नाही" हे बोचरे सत्य पुढील प्रत्येक लेखामागे भगभगत राहिले. जमलंच तर त्या लेखात विचारलेल्या प्रश्नावर जरूर विचार करा. शब्दांचे खेळ करून शिताफीने आडपडदा राखताना किती लेखांची कशी दमछाक होते हेही दिसू लागले. अशा ठिकाणी पर्याय दोनच, पडदा बाजूला सारा किंवा विषय बदला! ...चला, मी विषय बदलतो.

'पहिली कथा' ही पहिली म्हणून कितीही सहानुभूती निर्माण करता येत असली, तरी ती सुमार होती. जेंव्हा लिहली, तेंव्हा सुद्धा हेच वाटलं होतं! तिचे कौतुक तोंडदेखले झाले, नवेपणाचे म्हणून झाले की उपरोधाने झाले हे माहित नाही. पण काही वाचकांनी तिचे कौतुक केले. असो. आटव या कवितेने 'कविता हा माझा प्रांत नाही' हे ठळक केले. जणू मला माहीतच नव्हते! या कवितेमध्ये क्रमसुद्धा चुकल्यासारखा वाटला...एकूणच सुमार, पण विषयाशी कुठेही फारकत न घेतलेली ही कविता आजपर्यंत किमान (ब्लॉगरच्या आकडेवारीनुसार) पाचशे वाचकांचे डोके खाजवून गेली. कोवळे स्मित या कवितेबद्दल फारसे लिहावे असे काही नाही. तीत विसंगती टाळता आली हे यश, आणि ती टाळावी लागली हे अपयश.

जगण्याचा हावरटपणा, प्रकाशाच्या सणानिमित्त, पण असं कुठे बोलायचं नसतं, बघे, गोषवारा आणि लेबलं हे मला आवडलेले लेख. आता आवडले म्हंटल्यावर टीका कठीण होणार. जगण्याचा  हावरटपणा मध्ये दाखले कमी पडले, किंवा काही अंशी विसंगत झाले. त्या विषयाची व्याप्ती खूपच  मोठी आहे. प्रकाशाच्या सणानिमित्त हा लेख ठिगळ लावल्यासारखा होता. कितीही आकर्षक असली तरी ती ठिगळच. (जेंव्हा एखाद्या साहित्यकृतीला लोकं 'कोलाज' म्हणतात तेंव्हा त्यांना मनातून 'ठिगळे' म्हणायचं असेल की काय अशी मला नेहमी शंका येते). पण असं कुठे बोलायचं नसतं- या कवितेचा विषय मात्र तितकासा नवा नव्हता, तरी लोकांना आवडली. काही महाभागांनी ही स्वतःचीच म्हणून इतरत्र प्रसिद्ध केली! आजकाल, "पायरसी" झाल्याशिवाय चित्रपट सुपरहीट ठरत नाही! म्हणजे काही लेख ''गाजले'' म्हणायला वाव आहे :D


लेबलं काही जणांना खूप आवडली. काही जणांना तिची शैली ही एकतर अगम्य किंवा बाळबोध वाटली. मला ती शैली नैसर्गिक वाटली. या कथेचा सहज न दिसणारा विरोधाभास असा, की ही कथा स्वतःच एक लेबल घेऊन सुरु होते-आणि ते लेबल शेवटपर्यंत वाचकाशी प्रामाणिक राहतं. आता हे यश म्हणायचं की अपयश? पांढरपेशी 'नको ते वैयक्तिक विषय न काढण्याचे' धोरण या कथेने पाळले. कथेतील नायकाचे वय पाहता त्याच्या वैयक्तिक जीवनाची व्याप्ती ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही दिशांनी प्रचंड आहे. अर्थातच,ही कथा काहीशी अपूर्ण आहे. वास्तवाला हुलकावणी देणारी आहे. हे अपयश माझेच आहे, कथेचे नाही.. ती संपूर्ण सुचते, उमटत मात्र नाही.

प्रतिक्षा आणि संभ्रम हे पारंपारिक 'दिवाळी अंक' पठडीतले प्रकार जरी भासले तरी त्यात एखादाच मुद्दा रंगवण्याचा अट्टाहास आहे. त्यामुळे, खूप सुंदर झाले नसले, तरी ते व्यवस्थित आहेत. संभ्रम मधील नायिका ही बंडखोर नायिकांपेक्षा वेगळी आहे. ती त्यांची एक बाजू, दुखरी नस वगैरे नाही. द्विधा आहे आणि ती तिला मान्य आहे. प्रतिक्षा मध्ये तर भयंकर इच्छा आहे. "म्हातारपणापूर्वीच यावे" हा गोंडस शब्द वगळला तर नायक प्रत्यक्ष मरणाची वाट पाहतो आहे. ते अखेरीस त्याला 'लाभते'. नकारात्मक विषयाला रुपकांनी फुलवण्याचे काम या कथेने केले. या दोन्ही कथा, मला फारशा आवडल्या नाहीत, पण 'होशील पास' या वर्गात ठीक-ठाक बसतात.

'बघे' हा प्रयोग होता. तो फसला. राजकारण-समाजकारण याविषयी लिहिताना देखील मी माणूस, त्याचा स्वभाव, आयुष्य वगैरे बाजूनेच पाहिले. या आणि इतर काही अनुल्लेखित लेखांना वाचक मात्र पुष्कळ लाभत आले आहेत.***

पहिल्यांदा लिहिताना त्यावर सर्वंकष विचार होत नाही. एखादा वाचक, एखादा प्रसंग, मनातलं ब्लॉगवर पुन्हा नव्याने लिहिताना ओळींमधून उमटलेला सूक्ष्म विरोधाभास, एखादी झोंबणारी टीका, एखादे भरभरून कौतुक...सगळे मनस्वी रंग दाखवतात...
त्यायोगे मी श्रीमंत होत गेलो म्हणायला नक्कीच वाव आहे!
मनापासून धन्यवाद!
~ समाप्त ~
.MyFreeCopyright.com Registered and Protected