विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

बुधवार, ७ डिसेंबर, २०११

प्रतिक्षा{ Blog Post # 13 }


कथा

शीर्षक- प्रतिक्षा


माळी अजून नाही आला. एव्हाना यायला हवा होता. अर्थात, त्यामुळे काही या झाडांचं अडत नाही. आंब्याचा मोहोर, गुलाबाच्या कळ्या, पारिजातकाचा सडा, सोनचाफ्याचा घमघमाट कुणीच त्याच्यावाचून खोळंबत नाही. खोळंबतात ती पिकली पानं! सगळं आयुष्य ज्या झाडाला बहरवण्यात खर्ची घातलं, त्याच्याच पायाशी लोळण घेणारी. लाजिरवाणी, दीन दुबळी आणि लाचार...

**
प्रिय उमेश,

अनेक आशीर्वाद. मी इकडे 'निवारा'त यायचा, स्पष्टच सांगायचं तर, वृद्धाश्रमात यायचा निर्णय घेतल्यावर तू विरोध केला नाहीस हे मला जाणवलं. मात्र फारसं आश्चर्य वा दुःख झालं नाही.

आपल्यात अनेक छोटे मोठे वाद होत असत; त्याचा तू माझ्या येण्याशी संबंध जोडू नकोस. मुळात, तुला आणि सुनबाईला स्वतंत्र जगू देण्यापेक्षाही मला माझं स्वातंत्र्य जपणं महत्वाचं वाटलं म्हणून मी इथे आलो... आज तुझ्या आईची उणीव जाणवते.

असो. तब्येतीची काळजी घ्यायला इथेही तुझ्यासारखे हुशार डॉक्टर आहेत, चिंता नको. लवकरच गोड बातमी कळव असा नेहमीचा आग्रही सूर मी लावणार नाही. तुम्हा दोघांव्यतिरिक्त कुणालाही यावर बोलण्याचा अधिकार नाही.

आनंदात रहा.

तुझा,
बाबा

**

पण त्यात या दिमाखात उभ्या वृक्षराजीचा दोषच काय? पानं पडतात ती पिकल्यामुळे. त्यांचे झाडाशी असलेले बंध कमकुवत होतात म्हणून! आणि खरंतर ती आता झाडाला ओझं बनून राहिलेली असतात. त्यांच्यानंतर बहरलेली पानं आता हिरवीगार दिसतात. मग पिकल्या पानाच्या अधू आयुष्याला झाडानं का पोसावं? का त्या जीर्ण पर्णाना आपल्या अंगाखांद्यावर लोंबकाळू द्यावं?

...कधीतरी हीच पानं कोवळी होती. या उद्यानाची ती चैत्रपालवी होती. केवढं त्यांचं कौतुक! केवढा तो त्यांचा शृंगार! तेंव्हाही त्यांनी पिकल्या पानांना झिडकारलच असणार. एकेकाळी ज्यांच्या रुबाबात झाडं आपलं वैभव तोलत असत, तिच पानं आता गळून पडली आहेत. पुन्हा नवी पालवी फुटते, झाडं बहरतच राहतात.

**
प्रिय उमेश,

तुझं पत्र वाचून बरं वाटलं.

माझी इथली दिनचर्या विचारलीस. सकाळी आम्ही सगळे योगासनं करतो. ती करताना मला कॉलेजमधला कबड्डीचा खेळ आठवतो आणि आत्ताची माझी अवस्था बघून डोळ्यात पाणी तराळतं.

तर, योगासनं, वेगवेगळी भजनं, दुपारी वाचनालय, संध्याकाळी इथलं भलंमोठं उद्यान आणि रात्री कंटाळून नीरव झालेला 'गप्पीष्ट' कट्टा -  असा दिनक्रम असतो. वेळ 'घालवायचा' कसा हा प्रश्न मी सोडवलाय. फक्त त्यात पूर्वस्मृती अश्रुंचे अडथळे उभे करणार नाहीत, हे सांभाळणं कठीण होतंय.

आनंदात रहा.

तुझा,
बाबा.

**

मग ही गलितगात्र पानं आपले समदुःखी मित्र शोधतात. झाडाच्या सावलीत घोळक्याने राहतात. काही धाडसी मित्र उन्हातही जातात, लागलीच परततात. आता या पिकल्या पानांचा एक पाचोळा बनतो. आपल्या समदुःखी बांधवांना सामावून घेणारा.

या पाचोळ्याची सुद्धा गंमत आहे. गळून पडलाय तरी उत्साह दांडगा! वाऱ्याच्या जोरावर झाड डोलायला लागलं की हासुद्धा ठेका धरतो. आपल्या खंगलेल्या पानांनीशी केविलवाणं नाचतो. त्याला कुणीतरी समजवायला हवंय!

**

प्रिय उमेश,

तू पाठवत असलेले पैसे माझ्या गरजेच्या दुप्पट आहेत. व्यर्थ पैसा पाठवू नकोस.

बाकी इथे विचारशील तर नुकतंच आमचं एक स्नेहसंमेलन झालं. अगदी नाच, गाणी, रंगीबेरंगी पोशाख... सगळं लहान मुलांसारखं! मात्र म्हातारी माणसं लहानग्यांसारखी नसतात असं मला वाटतं. कारण कधी ना कधी लहानमुलं मोठी होणार असतात, सुंदर जगणार असतात!

या म्हातारपणाचा मात्र आता वीट आलाय. सकाळी दाढी करतांना लोंबते गाल खरवडून निघतात. विशिष्ठ कमोडची सक्तीची सवय, घशाशी येणारं अन्न, पथ्यकारक आळणी जेवण... स्वतःचीच किळस वाटू लागते.

मिठाई वर्ज्य असली तरी गोड आवाज मला अपथ्य नाही. सुनबाईचा रियाज कसा सुरु आहे? तिने एकदा इथे गावं अशी माझी इच्छा आहे.

आनंदात रहा. तरुण रहा!

तुझा,
बाबा

**

कधी ना कधी हे होणारच असतं. कोवळी पानं पुन्हा केंव्हातरी पिकणारच. फक्त त्यांना पाचोळ्याचं आयुष्य  फारकाळ सहन करावं लागू नये. त्यांच्या मनाची, भावनांची अशी अवहेलना करण्याचा झाडाला अधिकारच नाही. पण, नियतीचा नेम- सारंकाही माळ्याच्या हातात!

...

घ्या, माळीबुवा उशिरा का होईना आले खरे. पाचोळ्याची प्रतिक्षा संपली. आता माळी सगळी पानं नीट गोळा करेल. मग एकतर त्यांना बागेच्या कोपऱ्यात खड्डा खोदून पुरून टाकेल किंवा सरधोपटपणे आगीच्या जबड्यात देऊन निघून जाईल. जळताना सुद्धा त्यांचा धूर या झाडाचा गोड पापा घेऊन जाईल.

झाडं बदलतात, पिकलेली पानं बदलतात आणि पाचोळेही. पिकल्या पानात आणि धुरात केवळ माळ्याचेच अंतर. त्याच्या प्रतिक्षेचा हा मधला काळ हिशेबातून सुटला असता तर फार बरं झालं असतं, नाही का? 
***** **** *** ** *उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!


***** **** *** ** *


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected