{ Blog Post # 6 }
पहिलेपणाचं कौतुक फार असतं. पहिलं रोपटं, पहिलं लग्न (!), पहिलं बाळ, पहिलं मोठ्ठ भांडण, पहिला पेपर..हे पहिलेपण सृजनाच्या वाटेची चाहूल देतं. आज मलाही अशीच एक पहिली गोष्ट सापडली आहे. मी लिहिलेली पहिली कथा! ही बऱ्याssच वर्षांपूर्वी लिहिली आहे. कदाचित या पात्रांपेक्षाही मी लहान होतो तेंव्हा. असो, ती पहिली आहे आणि तिचे तेच कौतुक आहे!
वरवर पाहता ही सुमार दर्जाची भासते. एकसलग लिहिलेली आहे. आंग्लभाषेचा वापर तर नकोसा वाटू शकतो. तो मलाही आवडला नाही- पण तो वातावरण घडवायला मदत करतो हे नक्की. बाकी कथा किंचित बुळबुळीत आहे आणि चाकोरीबद्ध आहे हे मान्य. अशा बऱ्याच त्रुटी आहेत. पण ती पहिली आहे ना :)
काही गोष्टी मात्र जमवण्याचा चांगला प्रयत्न झालाय - उदा. 'नाटकाहून आल्याचा' नेमका उपयोग, गोड गैरसमजातून बाहेर येताना सूर्यास्त किंवा अगदी छोटे प्रसंग किंवा बारकावे. अर्थातच तो प्रयत्नच आहे, फार काही दिवे लावले नाहीयेत! बघूया तुम्हाला कशी वाटते, आज या ब्लॉग साठी ही पार जुनी कथा टवटवीत भासतीये!
प्रामाणिकपणे सांगायचं तर ही कथा इथे लिहिताना मनात भीती आहे. अशा चाकोरीबद्ध लिखाणाला प्रतिसाद कसा मिळेल? परिपक्व वाचक पाठ तर फिरवणार नाहीत ना? पण हा सहावा लेख आहे आणि या कथेचं निमित्तसुद्धा वेगळं आहे. यानंतरच्या काळात बरंच 'बरं' लिहू शकलोय मी :)
प्रामाणिकपणे सांगायचं तर ही कथा इथे लिहिताना मनात भीती आहे. अशा चाकोरीबद्ध लिखाणाला प्रतिसाद कसा मिळेल? परिपक्व वाचक पाठ तर फिरवणार नाहीत ना? पण हा सहावा लेख आहे आणि या कथेचं निमित्तसुद्धा वेगळं आहे. यानंतरच्या काळात बरंच 'बरं' लिहू शकलोय मी :)
टीप: हीच किंवा इतर कोणतीही कथा वाचताना एक भान ठेवा- कथा 'पुढे काय होतं?' म्हणून लिहिली जात नसते! कथा म्हणजे बातमी नाही. त्यात प्रसंग असतात, वळणं असतात. चित्रपटाचेही तेच! तीन-चार ओळींत जर तुम्ही त्याची 'स्टोरी' सांगू शकत असाल किंवा 'कथा कादंबरी मध्ये काय आहे' हे वर्णू शकत असाल तर तुमच्या अरसिकतेला तोड नाही!
इशारा- कथालेखकाच्या कल्पनेचा त्याच्या अनुभवाशी थांग धुंडाळणाऱ्यांचा निषेध असो!
***************
शीर्षक- वयच आहे तसं!
"Happy Birthday to you!" आई बाबा आणि आजीच्या या chorus मध्ये रोहन आज उठला. रविवार असल्यामुळे जरा उशीराच. गेल्यावर्षीच त्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला होता. हुशार, गोरागोमटा रोहन हल्ली अधिकच 'स्मार्ट' दिसू लागला होता. त्यातून आज अठरावा वाढदिवस!
पेपर वाचत असताना बेल वाजली. समोर अक्षय, "Happy Birthday! So, what's plan for today?" "Thanks! काही नाही रे... दुपारी कुठेतरी हॉटेलमध्ये आणि रात्री एका नाटकाला जायचं ठरवलंय. तुला मेल केला होता ना, रिप्लायच नाही?" इति रोहन. तेवढ्यात रोहनच्या आईनं उघडं राहिलेलं दार लावलं. स्मितहास्यकरून ती किचन मध्ये कॉफीचा एक कप वाढवायला गेली.
"यार, आमच्याकडे कलरिंग सुरु आहे. पीसी वगैरे आवरून टाकलाय आणि सायबरला जायला वेळच नसतो" हे ऐकतानाच पेपर वाचणाऱ्या रोहनने लक्ष वेधलं, "काय जाहिराती असतात हल्ली! लग्नं जमवायची तर बायोडेटा, ब्लडग्रुप, उंची सगळंच छापलंय. जशी काही नोकरीचीच जाहिरात" "पण त्यात एक नसतं" "काय?" "preference to experience!" अक्षयच्या या विनोदाला दोघंही टाळी देऊन हसले. त्या आवाजात आईनं आपटलेल्या कपचा आवाज विरून गेला. 'असले' जोक्स मारल्याबद्दल काही बोल सुनावण्याच्या बेतात होती ती. पण मित्रासमोर, त्यातून वाढदिवशी? तो विषय तिनं काढलाच नाही.
रात्री बाबा आल्यावर तिनं हा प्रसंग सांगितला. ते सुद्धा मनमोकळे हसले. पण, आपल्या सहधर्मचारिणीचे रागरंग पाहून त्यांच्यातल्या 'बापाला' जाग आली असावी. आज रोहन मोबाईल घरीच विसरला होता. अनायसेच, त्याला आलेले कॉल्स, मेल्स, मेसेजेस, त्याची फ्रेंड लिस्ट सारंच बाबांना अचानक खुलं झालं. खरं तर त्यात हल्ली 'नॉनव्हेज' म्हणतात असं काहीच नव्हतं. रोहन नक्कीच तेवढा सुसंस्कारित होता आणि त्याचे मित्रमैत्रिणीही. "निम्म्या तर मुलीच आहेत" बाबा उदगारले. खरं तर पारदर्शकता आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर बाबांचा विश्वास होता, आईचाही. पण, आपल्याच मुलाच्या बाबतीत ते स्वीकारणं त्यांना कठीण जात होतं.
"ती मुलगी कोण होती?" अद्याप कधीही न विचारलेला हा टिपिकल प्रश्न बाबांनी विचारला. "ती? ती नेहा! आज टायरमधली हवाच कुणीतरी काढली म्हणून तिनं मला ड्रॉप केलं. मग बाईक कौस्तुभच्याच घरी ठेवली, तो तिथून जवळ राहतो ना"
नाटकाहून नुकत्याच आलेल्या, आपल्या मुलाच्या या उत्तराने मुळीच न शमलेला बाबांचा पारा बराच वर चढला होता. ते रागावले. त्यातून गेल्या टेस्टमध्ये त्याच्या 'खाली' आलेल्या निकालाचाही समाचार घेतला गेला. तेंव्हापासून घरातलं नेट बंद केलं गेलं आणि रोहनचा सेलसुद्धा.
रात्री झोपण्याआधी रोहन नेहमीप्रमाणेच त्याच्या खोलीत डायरी लिहित होता, "मागे बाबाच म्हणाले होते की माणसाचा आदर हा त्याचे अंगभूत गुण, कर्तृत्व, स्वभाव, समृद्ध अनुभव यांमुळे केला जातो, करावा. मग बाबा असे वागले असताना मी का गप्प बसलो? माझीच चूक होती म्हणून की केवळ ते माझे बाबा आहेत म्हणून? ...
कधीकधी होतात कमी मार्क्स. म्हणून एवढं काय त्यात? समुद्राला भरती येते तशी ओहोटीही येतेच ना? उसळलेला चेंडू खाली येतोच ना? पुन्हा वरही जातो!...
आणि हल्ली काहीही झालं की मार्कांवर येतात. मला तर वाटतं, एकदा का चांगला रिझल्ट लागला की आपण सुटलो, हे आपल्यावर खुष! हे लाच घेणाऱ्या ट्राफिक हवालदारासारखंच नाही का? मामाला एकदा थोडे चारले की नंतर बिनदिक्कत ड्राईव्ह करा" ...अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांनी गच्च भरलेली त्याची डायरी आजी चोरून वाचत असे. तिचं मन अस्वस्थ व्हायचं. पण संवाद साधायला आजकाल कुणाकडेच वेळ नव्हता.
...
असंच एका दुपारी उशीरा जेवणं झाली. काहीशा मरगळलेल्या रोहनला खालून हॉर्न ऐकू आला. मनीष आला होता. "आईs, मी आत्ता आलो गं" सांगून रोहन खाली पळाला. "दार लावून घे. ह्या पोरांना घरी येऊन नाही का भेटता येत?" आई ओरडून बोलत होती. "अगं त्यांनाही त्यांचं अवकाश आहे, थोडी प्रायव्हसी लागतेच की!" आजीचं हे वाक्यं टीव्हीमुळे आईला कळलंच नसावं. तिनं नुसतीच मान डोलावली.
"हाय पटवर्धन बुवा! कसे आहात?" मनीषनं सुरुवात केली. "ठीक. तू काय म्हणतोस? एवढ्या दुपारी कसा? लाईट गेलेत का तुमच्याकडचे?" रोहनने प्रतिसाद दिला. "हल्ली नाही जात दुपारचे. जरा सहजच आलोय. तुला काही काम आहे का? मी येतो नंतर." रोहनने पटकन त्याचा हात धरला. "काही नाहीये, थांबना थोडावेळ" आपल्याला हल्ली मित्र अधिकच जवळचे, मनमोकळे वाटू लागलेत, त्यांचा सहवास हवाहवासा वाटतोय याची त्याला जाणीव झाली. मग बराच वेळ त्यांच्या गप्पा बिल्डींगसमोरच्या झाडाच्या सावलीत रंगल्या. "अरे बरं झालं आठवलं. मला तुझ्या परवाच्या नोट्स हव्या होत्या." मनीष म्हणाला. "द्यायला काही नाही रे, पण सध्या त्या मला लागतायत. तीन-चार दिवसात देतो." इति रोहन. तेवढ्यात तिकडून मधुरा आली,"अय्या तू इथेच राहतोस?" आपण घरच्या शॉर्टवर आणि बनिअनवरच आहोत म्हणून रोहन काहीसा ओशाळला. "हो! तू कशी इथे?" "माझे मामा पलिकडे राहतात . बरं झालं भेटलास, उद्या कॉलेजमध्ये तुझ्या परवाच्या नोट्स आणशील?" रोहन लगेच हो म्हणाला. ती तिथून गेली. "तू तर लाईन मारायला लागलास रे, मला तीन-चार दिवसांत देणार होतास. बायदीवे, ही कोण? मधुरा ना हिचं नाव?" रोहनने हसत मान डोलावली.
...आज नेहमीप्रमाणेच घरात कुणी नसताना आजी डायरी वाचत होती, "हल्ली मी मुलींशी बोलताना बराच हळवा होतो. आपण चांगले दिसतोय नं? नीट बोलतोय ना? याचं मी भान ठेवू लागलोय. इन ब्रिफ, मी सॉलिड इम्प्रेशन मारत असतो...मधुरावर जरा जास्तच...मी तिच्या प्रेमात? हो कदाचित, की नाही? ..कन्फ्युज्ड " आता मात्र आजी खूपच अस्वस्थ झाली.
तेवढ्यात बेल वाजली. "कुणीतरी मिनिस्टर वारले म्हणून ऑफ मिळाला. तसेही आज प्रेंक्टीकल्स नव्हतेच" हातात पाण्याचा ग्लास देणाऱ्या आजीला रोहननं स्पष्टीकरण दिलं. "ठीक आहे, मी विचारलं का लवकर आल्याबद्दल?" आजीच्या या विश्वासदर्शक गोड बोलण्यावर रोहनचं मनस्वी प्रेम होतं. आजीला मिठी मारून तो आत गेला. "आजीs, तू माझी डायरी वाचलीस? ओह नो!!" आजीकडून उघड्या राहिलेल्या डायरीमुळे तिचं बिंग फुटलं. आजी आत आली, रोहनला जवळ बसवलं. "कशी आहे रे दिसायला मधुरा? तिचं आडनाव नाही लिहिलंस ते!" रोहन अवाक झाला. तिच्या या प्रश्नानं तो काहीसा लाजला आणि मग अधिकच मोकळा झाला, "तू आई-बाबांना नाही नं सांगणार?" आजीनं नकारार्थी मान डोलावली. "आमच्याच क्लास मध्ये आहे. 'पेंडसे' आहे गं आडनाव तिचं. आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. म्हणून मग..." "पण तुम्ही लोक म्हणता तसं शारीर नाही"
काहीशी शांतता पसरली. आजी सांगू लागली,"रोहन, तुला खरं सांगू का? तू घरी एवढा मोकळा नसतोस. मित्रमैत्रिणींमध्ये गेल्यावर तुला ते खूपच जवळचे वाटतात. साहजिकच आहे ते, विशेषतः या वयात. त्यातून मुलींशी बोलताना तुझं भान- या सगळ्याच तुझ्या वयाच्या सुंदर छटा आहेत. आम्हीही यातून गेलोय. तुमच्याकाळात अधिक व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अशा वातावरणात पुरुष म्हणून तुला स्वतःची ओळख पटू लागलीये. तुमची आता स्त्री-पुरुषांच्या मनांशी ओळख होत आहे. तुला वाटतंय ते शारीर प्रेम नाही पण ते तसंही नाही जे तुला भासतंय. ते तुझ्या निरागस मैत्रीचं प्रतिबिंब आहे एवढंच"
"ही तर सुवर्णसंधी आहे, स्वतःला आणि इतरांना जाणून घेण्याची. स्त्री-पुरुषांत, माणसामाणसात निकोप नात्यांची सुरुवात असते ही. आयुष्यात पुढे विविधरंगी अनुभव घ्यायचे आहेत. वेगवेगळी माणसं भेटतात, त्यांच्याशी संतुलित व्यवहार साधायचे आहेत. सशक्त अशी नाती निर्माण करायची आहेत. आयुष्याचा जोडीदार निवडून पुढे संसार थाटायचाय...ही तर दिशा आहे, अजून पुढे प्रफुल्ल आयुष्य मांडून ठेवलंय"
इतकं पटणारं कुणीच कधी बोललं नव्हतं रोहनशी. त्याच्या डोळ्यात पाणी तराळलं. बाहेर सूर्य अस्ताला जात होता. मात्र त्याला त्या अस्तापेक्षाही गगनातील रंगाची, मंद वाऱ्याची झुळूक मोहक वाटत होती. एका आनंदयात्रेच्या शुभारंभाची जाणीव त्याला झाली होती.
४ टिप्पण्या:
इशारा- कथालेखकाच्या कल्पनेचा त्याच्या अनुभवाशी थांग धुंडाळणाऱ्यांचा निषेध असो! puneri zala re
Haha :)
छान लिहीली आहेस.. तेव्हढं ब्लॉगच्या डिझाईनचं बघ...
बाकी ब्लॉग छान ..साधेपणा आवडला...
@आ का -
धन्यवाद!
डिझाईनचे काय? काही सुचवायचे आहे का?
मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.
भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.
शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.