विनंती: थेट comments लिहा. उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!

(पूर्वी facebook इत्यादी वापरून लिहिलेल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया- comments- आता काही तांत्रिक कारणास्तव पाहता येत नाहीत. तरीही, इतर मार्गांनी प्रतिक्रिया लिहिण्यास नक्कीच वाव आहे!)

रविवार, २१ ऑगस्ट, २०११

संभ्रम










{ Blog Post # 9 }


सातत्याने लिहिलं जाणं ही कोणत्याही ब्लॉगची गरज असते आणि वाचक न गमावणं ही ब्लॉग-लेखकाची. असो, आज खूप दिवसांनी लिहितोय आणि कथाही जुनी आहे. पण इथे नवीन आहे. मध्यंतरी, मी माझ्या सुमार लेखांना 'ते मी तुलनेने लहान असताना (म्हणजे चार-सहा वर्षांपूर्वी) लिहिले आहेत' असं सांगून सहानुभूती मिळवतो असा आरोप एकाने केला. त्यावर मी विचार टाळला आहे :D तुम्ही याआधी इथे लिहिलेली कथा वाचली असेलच. ही कथासुद्धा तशीच काही वर्षांपूर्वी लिहिली होती. योगायोग असा की, 'वयच आहे तसं' च्या नेमक्या दुसऱ्या दिवशी ही कथा लिहिली गेली.. यावेळी मी काहीही समीक्षावजा प्रास्ताविक करत नाही, काय ते आपणच पहा :) 

*********
शीर्षक- संभ्रम

आज 'स्कार्फ' विसरल्यामुळे सूर्यापासून चेहरा लपवत चालणं खूपच अवघड जात होतं. ताठ मानेनं चालताना आपण रोज काय काय तुडवतो याचं भान येत होतं. त्या किळसवाण्या रस्त्यानं मनातल्या विचारांना अधिकच गुंतवून टाकलं होतं. गेले अनेक दिवस तिच्या मनात विचारांचा कल्लोळ होत असे. या झळांच्या साक्षीने तो झेलणं अवघड होऊन बसलं होतं. तेवढ्यात एक पाणपोई दिसली. अहाहा! कधी नव्हे ते तिला पाणपोई उघडून आपल्या नावाच्या मोठमोठ्या पाट्या लावणाऱ्या नगरसेवकाचे आभार मानावेसे वाटले. कोरडा पडलेला घसा आता निदान जिवंत वाटत होता. अजून खोली पाच-दहा मिनिटांवरच होती. झपाझप पावलं टाकत ती खोलीवर पोहचली.

उकाडा असूनही तिला पंखा नको होता. त्याचा आवाज त्या एवढ्याशा दोन खोल्यांच्या घरात गजबजाटाची जाणीव करून देई. तिला आता शांतता हवी होती. ती नुसतीच बसून राहिली. नीरव झुळूक शरीराला आल्हाद देत होती. उठून ती बाथरूममध्ये गेली. थंड पाण्याच्या शॉवरखाली एखाद्या ध्यानस्थ मुनिप्रमाणे बसून... एक आगळीच अनुभूती येत होती. ते थंड पाणी शरीराला कुरवाळून जात होतं. उन्हात तापलेली त्वचा आता थंड होत होती आणि आतल्या घामाचे ओघळ पाण्याच्या प्रवाहात विरून गेले होते. आता तिचा दीर्घ श्वास आणि पाण्याचा मंजुळ कलरव तिच्याशी बोलत होते. वाहून जाणाऱ्या, शरीराच्या प्रत्येक भागाला गोंजारत, खारट होत जाणाऱ्या पाण्यात तिला पूर्वीचे दिवस आठवू लागले.

***

अगदी लाडात वाढलेला जीव. कळायला लागल्यापासून सतत आपला चुणचुणीतपणा दाखवून द्यायची सवय लागली होती. पहिल्या पावसांत भिजताना, कागदाच्या होड्या मोठ्या प्रेमाने सोडताना, आपणच बांधलेला किल्ला मनसोक्त तुडवताना... सगळे प्रसंग लख्ख होत होते. मग, थोडं शहाणपण येऊ लागलं.

कारण, तसं वागलं की लोक शहाणं म्हणू लागले होते.

आजूबाजूच्या जगानं आणि शरीरानंसुद्धा पुन्हा नव्याने जन्माला घातलं. नव्या जाणीवा दिल्या. नवे स्वानुभव दिले. 'समंजस' या गोंडस शब्दाचा अर्थही कळू लागला होता. शिक्षण शाळेतून कॉलेजात जाऊन पोहचलं होतं. आत्ता 'सगळं आलबेल होतं' असं वाटतं. पण तेंव्हा, कितीदा उलथा पालथी झाल्या होत्या. छोट्या छोट्या कारणांवरून रुसवे फुगवे होत होते. कधी आई जवळची तर कधी मैत्रीण असा गोंधळ उडत होता. आधी मुलगी आणि मग 'बाई' म्हणून घडणारी ओळख 'माणूस' म्हणून स्वतःला शोधत होती.

अभ्यासक्रमात शिकलेला 'commitments' हा शब्द तिला आठवला. मुळात जगणं आणि जिवंत असणं यातला फरक शोधण्याचा प्रवास चाहूल देत होता. 'commitments' शब्द बराचसा अनुभवलाही! आधी घर, मग शिक्षण, नुकतीच टळलेली लग्नाची तयारी... सगळ्याच 'commitments' दिसत होत्या. शेवटचं मनासारखं केंव्हा जगली होती ती? केंव्हा उठली होती आळोखे-पिळोखे देत? की सगळंच गमावून बसली होती? अगदी शाळेतल्या गृहपाठापासून ते स्वतःहून निवडलेल्या समाजकार्यापर्यंत... तिला तिडीक आली होती. प्रत्येकच वेळी डोक्याशी कुठलीतरी भुणभुण, कसलासा त्रागा, कसले नी कसले बांधलेपण... सगळं उरकून टाकावसं वाटे. तिनं बऱ्याचदा कामं संपवून दिवस मोकळे काढायची शिकस्त केली. पण दिवसांमागून दिवस जायचे तसं लोढणं पुन्हा मागे! काय उद्देश होता रोजच्या धावपळीचा? भूक नसताना केलेल्या स्वयंपाकाचा? इच्छा नसताना अंथरुणात तगमगुन काढलेल्या रात्रींचा? ...जगणं? पण ते सतत काही वेगळंच असल्यागत भासे. हे सगळं करून पुन्हा जगण्यासाठी वेळच कुठे शिल्लक होता? रोजच जगण्यासाठी धडपड, चाकोरीबाहेरची वाट, स्वतंत्र निर्णय आणि सविवेकी पावलं... तरीही जगणं आणि जिवंत असणं यातला स्वप्नवत फरक ठळक होत नव्हता.

नाण्याला दुसरीही बाजू असते. पहिल्यांदा सायकल शिकल्याचा आनंद, पहिली फोडणी, पहिलं प्रेम, पहिली रात्र... सगळ्याच गोष्टी नवलाईच्या काळात फारच लोभसवाण्या होत्या. आयुष्य भरभरून आनंद देऊन गेलं होतं. तरीही, सारं सोडावसं वाटलं होतं. प्रत्येक क्षण संपूर्णतः स्वतःच्या इच्छेनेच जगण्याचा तिने निर्धार केला होता. तिला आता कुणी पाठीशी नको होतं आणि कुणी पाठीवर ठेवलेल्या हाताचा भारही सोसवत नव्हता.

"इतकं चांगलं स्थळ असूनही..''
''प्रेमात पडली होती ना त्याच्या? मग लग्नाला का नकार दिला?''
''आता काय आयुष्यभर एकटीच राहणारेस?''
''हल्लीच्या मुलींचे नखरेच फार''
''कुठूनही काहीही वाचून येतात आणि निघतात समाजकार्य करायला''
''जरा कमी शिकलेलीच पोरगी बघावी, आपली पायरी ओळखून असते''

सगळी वाक्यं, सगळे शब्द, आकार-उकार मनावर आदळून आदळून मनही बोथट होऊ लागलं होतं. प्रेमात तर ती खरच होती. त्याने घरी येऊन रीतसर मागणीही घातली. पण, पूर्ण विचारांती तिला दुसरा पर्यायच दिसत नव्हता. लग्नाला नकार देऊन तिनं पुणंही सोडलं. मग इथे आली, गडचिरोलीत. तिचं क्षेत्र तिनं निवडलं. चूल-मूल संसाराला नाही म्हंटल. तितकं नमुनेदार आयुष्य मानवणारच नव्हतं. साधेपणाची ती सुद्धा भक्त होती; पण म्हणून चार भिंतींपलीकडे बघायचंच नाही? रोज स्वयंपाक, धुणंभांडी, घर सांभाळून केलीच तर एखादी नोकरी, उसनं अवसान आणून सगळ्यांशी गोड-गोड वागणं, उगाच एक 'आदर्श' गृहिणी म्हणवत आयुष्य घालवणं... फार तर एखादं मूल, तेवढाच काय तो नवीन विषय आणि मग त्यासाठी अनंत तडजोडी- आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक- सारं एका रहाटगाडग्याकरिता. आयुष्य जुनाट, रटाळ. मग आपणच आपली समजूत काढायची, छोट्या गोष्टीत आनंदाची गणितं मांडायची आणि दिवस ढकलत राहायचे.

तिला हे सगळं नको होतं. 'MSW' ही पदवी घेताना मनानं खूप उंच भरारीची स्वप्नं पाहिली होती. मैलोन्मैल तुडवत आर्त, अतिविकल हाकांना प्रतिसाद द्यायची तिची तयारी होती. रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी होती तर ती फक्त मनासारखं काम करण्यासाठी! कुणाचे अश्रू पुसण्यासाठी, कुणाचा भार हलका करण्यासाठी. 'जगणं' या शब्दाचा नवा अर्थ तिनं पक्का केला होता. म्हणूनच मग नकार दिला. अनावश्यक बंधनं झुगारली. तरीही, 'पूर्णतः आनंद' असं काही सापडत नव्हतं. दिवसातली सगळी कामं संपवून मोकळा श्वास घेता यावा, घरी येऊन कुणाशी गप्पा मारता याव्यात, कुणाच्या कुशीत अलगद विसावा घ्यावा असं वाटे.

***

कर्कश्श बेल वाजली आणि ती व्यावहारिक अर्थानं भानावर आली. पटकन अंग टिपलं, गाऊन अडकवला आणि दार उघडलं. नवं काहीच नव्हतं. मोलकरीण नेहमीच्याच वेळेत आली होती. आजपर्यंत आधीचं उरकून नव्यानं काही सुरु करण्याचा यत्न केला पण नवं असं काही उरतच नव्हतं. कधी कधी हे चाकोरीबाहेरचं जगणं सुद्धा उद्दात्त ध्येयाआडून 'नवं जगण्याच्या' भुकेचं कारण देई. अस्वस्थ करून जाई.

एक मनाजोगा साथीदार, छोटंसं कुटुंब.. छान स्वयंपाक करून प्रेमाचा पोटातून जाणारा मार्ग शोधणं... मुलं- तसं खूप कठीण, बऱ्याच तडजोडी - पण निदान 'तथाकथित समाधानासाठी' हेही करून पाहणं... वात्सल्य, जिव्हाळा आणि चाकोरीतलं असलं तरी आनंदाचं समीकरण, स्वप्न आणि सत्यात निरागस हिंदोळे... हे सगळंच निरर्थक असतं का?
पण हे तर सगळेच करतात. नाईलाज म्हणूनही कदाचित.
मुळात 'निव्वळ वेगळं काही करायचं' या अट्टाहासापायी तिनं हा निर्णय घेतला होता का? कुणाच्या आपल्याविषयीच्या स्वप्नांना चुरगाळून नेमकं हाती काही उरलं होतं का?
की खरंच स्वप्नांची ओढ मनस्वी होती? आता जाणवतायत ते संकीर्ण पडसाद नसतील, कशावरून?

प्रश्न, प्रश्न, प्रश्न. तिला काहीच सुचेनासं झालं. तिनं टीव्ही लावला. तो कलाकलाट माजवणारा पंखा लावला. मगाशी शांततेत बरं वाटणाऱ्या मनाला आता या गोंगाटात विसावा मिळत होता. कारण, मनातल्या आंदोलनांना क्षीण करता येणार होतं. प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं धाडस ती आता करू शकत नव्हती. त्यामुळे श्वासागणिक डिवचणारे प्रश्न मात्र कमी होणार नव्हते. मागे वळून पाहताना पुन्हा संभ्रम होत होता.


***** **** *** ** *

उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा! 
मला twitter वर देखील follow करू शकता.. उजवीकडे 'about me ' पहा!


आगामी: थोड्याफार गमती-जमती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.

भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.

शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.

MyFreeCopyright.com Registered and Protected