{ Blog Post # 2 }
कदाचित हे सापडू शकेल :
'का?' असा प्रश्न पडणं हे कोणत्याही सबुद्ध माणसाचं सुदैव आहे. असाच प्रश्न मलाही पडला की, 'का लिहावा blog?'. म्हणजे, जी काही थोडीफार लोकं आपल्यावर मनापासून प्रेम करतात, आपल्याला ऐकतात-वाचतात त्यांना एखाद्या रटाळ पुराणानं का छळावं? अगदी व्यक्तच व्हायचं असेल, तर त्यासाठी कोकीळ खुलेआम प्रणयाचं कूजन करतो तसा हा सार्वजनिक blog प्रकार का करावा?
...मुळातच, माणसानं भावना व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या माणसाचा आधार का घ्यावा? एकटे, अगदी स्वतःपुरतं व्यक्त झालो तर काय हरकत आहे? म्हणजे उद्या एखाद्याला सुचली कविता तर त्यानं ती स्वतःलाच ऐकवावी, स्वतःच वाचावी. ती दुसऱ्याला दाखवण्याचा, त्याच्याकडून दाद मिळवण्याचा अट्टाहास का? कळायला लागल्यावर लहान मूलसुद्धा एकट्यानं आरडा-ओरडा करत नाही. मात्र, निसर्ग असा नाही. दुःख झालं की अश्रू ओघळतात, आनंदाच्या क्षणी नकळत हसतो आपण, राग आल्यावर लाल होतो, भीतीनं कोरड पडते, हात-पाय थरथरतात... हे सारे दुसऱ्या माणसाची वाट पाहत नाहीत. इथे प्रेक्षकाची, श्रोत्याची - आधाराची गरज भासत नाही. मग आपण असे का? भावना व्यक्त करताना, कला सदर करताना, दुःख सोसताना, भीतीनं थरथरताना 'आधाराची' गरज का भासते? विश्वास बसत नसेल तर सहज आजचं वर्तमानपत्र उघडा. येन-केन-प्रकारेण कित्येक जण आपल्या भावना, आवड-निवड सार्वजनिक करताना दिसतील. इंटरनेटवरच्या माहितीहीन blog ची संख्या मोजा. किंवा कशाला, स्वतःलाच निरखून पहा. Facebook, Orkut, Twitter ही 'गरज' कशी निर्माण झाली ते धुंडाळा. तुमच्याच मित्र-मैत्रिणींमध्ये कुटुंबात, नातेवाईकांमध्ये तुम्ही लहान-मोठ्या फरकानं कसे व्यक्त झालात ते आठवा. हे व्यक्त होणं म्हणजे एखादा कलाप्रकाराच असावा असे आजिबात नाही. कोणतीही सहज व्यक्त केलेली भावना, विशद केलेला विचार, ओढून-ताणून-आठवून सांगितलेला विनोद, मुद्दाम मारलेला लक्षवेधी टोमणा, एखादी status update , निष्कारण upload केलेले फोटो आणि त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस अशा कित्येक ठिकाणी आपल्याला प्रेक्षक हवा आहे. श्रोता हवा आहे. 'आधार' हवा आहे.
कारण आपण बहुतेकजण दुबळे आहोत. कुणी कळत-नकळत प्रशंसाप्रिय आहे. बहुतेकांनी कृत्रिम तराजू जपले आहेत. असं म्हणजे भारी-तसं फालतू, याला rough-n-tough म्हणायचं आणि ते नाजूक-साजूक, हे cool ते bore, हा हुशार तो ढ, असं म्हणजे back-bencher तसं म्हणजे geek ... एक ना अनेक प्रकार! बहुतेकांच्या दुबळ्या मनांना किचकट व्याख्यांनी विळखा घातलाय. कदाचित हे मान्य होणार नाही, कदाचित अहं दुखावेल. पण, आत कुठेतरी आपल्या या दुबळेपणाची जाणीव नक्की असेल. हा दुबळेपणा दूर करणं खूप अवघड असलं तरी अशक्य नाही. माझाही उद्देश तोच आहे. 'अभिव्यक्ती ही गरज न राहता सहजता बनावी' अशी आशा आहे. अर्थातच, तक्रार व्यक्त होण्याच्या 'गरजेशी' आहे - व्यक्त होणंच चूक म्हंटलेलं नाही. सहजतेचा आग्रह आहे. अर्थातच उद्देश किंचित स्वार्थी आहे. कारण, तथाकथित स्थितप्रज्ञतेचा (stoicism) आव आणताना मीही blog लिहितोच आहे. हा सहज व्यक्त होण्याचा सराव आहे :D , असो.
तुम्ही म्हणाल , "बरं, अभिव्यक्ती ही गरज न राहता सहजता बनावी. छान वाक्य आहे. मग हा blog आमचं प्रबोधन वगैरे करणार आहे का?" यावर माझं उत्तर आहे- नाही! हा blog असलं काहीही करणार नाही. प्रबोधन वगैरे करण्याइतका मी छळकुटा नाहीये हो! एक गोष्ट मात्र नक्की, इथे किंवा कुठेही-संवादातून, मौनातून उमटलेला मी सहज असेन. या व्यक्त होण्यात 'काय वाटेल कुणाला' ची उत्सुकता नसेल, ओझे नसेल आणि 'वाटलं तर घ्या नाहीतर फुटा' असा तुसडेपणाही नसेल. निर्विवाद हा एक छोटासा प्रयत्नच आहे. चाचणीच आहे. उद्या मीच विरोधाभासी बोलेन. अर्थातच, त्यात वावगे काही नसते. कारण स्वतःशीच विरोधाभास साधल्याशिवाय माणसाच्या वैचारिक आणि मानसिक प्रगतीला चालना मिळू शकत नाही. (खूप मोठ्ठ वाक्य बोलून गेलो का? :D )
आपण blog वर किंवा इतरत्र संवाद साधू तेंव्हा हे सापडणार नाही / सापडू नये :
- मुळमुळीत, गुळगुळीत चोथा झालेल्या प्रेमकथा - सुळसुळीत केसांच्या आणि बुळबुळीत ओठांतल्या.
- थेट दुसरं टोक गाठणारं ज्वलंत वगैरे 'solid matter'
- सहज, नैसर्गिकपणे, प्रयत्न न करता वापरलेली 'नाक्यावरची भाषा'
- सखाराम गटणे शैलीतलं बोजड, अगम्य आणि निरुपयोगी विवेचन
- पोक्त, वयाची सत्तरी उलटल्यागत लिहिलेले 'अनुभवाचे बोल'
- उगाच वाचक/ श्रोते खेचण्यासाठी वापरलेल्या 'वैयक्तिक आणि खाजगी गोष्टी'
- आड-पडदा ठेवून, संकोचाने मांडलेले अर्धवट विचार
- नमुनेदार पुस्तकी भाषा ( तुम्हाला कट्ट्यावरची भाषा सोडून सगळं जग पुस्तकी वाटत असेल तर नाईलाज आहे! )
कदाचित हे सापडू शकेल :
मी आजवर थोडफार लिहिलं आहे. कधी कागदावर, कधी सभांवर, कधी मनात, कधी कुणाच्या कानात, डोळ्यांत. कधी लिहिलेलं, बोललेलं काही चुकून मला गौरवूनही गेलंय, बक्षिसं देऊन गेलंय. या सगळ्यांपेक्षा मला मोलाचं असं काही लाभलं असेल तर ती आहेत माणसं! माझं कुटुंब, माझे मित्र, मैत्रिणी, शिक्षक, कधी कामानिमित्त भेटलेली मंडळी, एखादा बडबडा रिक्षावाला, कर्कश्श भाजीवाली, एखादा ढिम्म सहकारी, एखादी उत्साही 'बॉस' ... तुम्ही सगळ्यांनी मला खूप काही दिलंय. त्यातूनच माणसाचा स्वभाव घडतो. माणूस घडतो.
माझ्या संवादांत किंवा अगदीच blog वर या निर्झरातला एखादा थेंब सापडू शकेल, ओलाव्यापुरता.
उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!
उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता जरूर कळवा.. अगदी सोपे Google+ आणि Twitter वापरून ब्लॉगशी जोडलेले रहा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.
भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.
शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.