{ Blog Post # 12 }
...आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर लक्षात येतं की आपणही कोणत्यातरी लेबलखाली, आपणच तयार केलेल्या 'सोशल इमेज' खाली, कुठल्यातरी वर्गात गणले जातो. पटावर आपलंही नाव आहे. काहीजण हे पाहून बुचकळ्यात पडतात. काही येनकेनप्रकारेण समाधानी असतात. काही दुर्लक्ष करतात. काही बंड करतात. काही जणांची असह्य घुसमट होते. असह्य आणि अपरिहार्य...
यातल्या प्रत्येक प्रकारात आंदोलनं आहेत. त्यातली एक सूक्ष्म आणि बरीचशी साधी-सुधी गोष्ट पुढे आहे. त्यात 'काय' होतं यापेक्षा 'कसं आणि का' हे ओळखून तुम्ही प्रतिक्रिया द्याल अशी आशा आहे. शैली जरा वेगळी आहे, जसं उमटलं तसं इथे आहे.
शीर्षक - लेबलं
"वेळच्या वेळी कामं कराs , जागच्या जागी वस्तू ठेवा.
भरपूर अभ्यास करा. परीक्षेचा बाऊ करून उत्तम 'मार्क्स' मिळवा.
पुन्हाs पुढचे निर्णय घ्या...
खरंतर, ठरलेले निर्णय अमलात आणा!
बक्कळ पगाराची नोकरी मिळवा.
पुन्हा पुन्हा तेच करा... हे करा, ते करू नकाs हेs तेs ह्यांव त्यांव.."
आरशात बघत अमोल बडबडतो. बऱ्याचदा तो असं आणि हेच बोलतो. पण, तो काही वेडा नाही... तो तर हुशार आहे. 'हुशार' लोकं कशी असतात? अमोलला ते आरशात दिसतं.
त्याला तिटकारा वाटतो!
***
"अमोल प्रभाकर जोशी. एफ वाय बी ए" अमोलनं खिडकी पलीकडल्या माणसाला सांगितलं. पलीकडच्या माणसानं अजून काहीतरी विचारलं. मग अमोलनं काही कागदपत्रं दिली. 'रुटीन प्रोसेस' होती ही कॉलेजसाठी, पलीकडच्या माणसासाठी, पण अमोलसाठी नव्हती.
***
पहिलीत पहिला, दुसरीत तिसरा, तिसरीत पुन्हा पहिला, चौथीत दुसरा... असा निकाल सांगणाऱ्या मुलांपैकी अमोल एक. सगळ्यांना अमोलचा हेवा वाटायचा.
'हुशार आहे हो!'
'चुणचुणीत आहे मुलगा'
'अरे वा! अभिनंदन'
कुणाला आवडत नाहीत अशी वाक्यं ऐकायला? अमोलच्या आईला आवडायचं. बाबांनाही आवडायचं. अमोलला काहीच वाटायचं नाही. अमोलच्या मित्रांना 'एवढं' आवडत नव्हतं. अमोलचे मित्र...किती मित्र होते अमोलला? किती आहेत? कोण कोण होते? कोण कोण आहेत? ...असे प्रश्न खुद्द अमोलला सुद्धा पडतात. शाळेत पहिल्या येणाऱ्या मुलाचे किती मित्र असतात? जवळपास सगळेच! अमोलशी सगळेजण छान बोलतात, अजूनही. अमोल सगळ्यांशी छान बोलतो, अजूनही. मनीष, तुषार, अक्षय, अपूर्व... मित्रांची नावं अशी कुठे असतात? मन्या, तुष्या, अक्षा, अप्प्या - याला मित्रांची नावं म्हणतात. अमोलच्या मित्रांपैकी कुणाचंच नाव असं नाही, म्हणजे खरंतर अमोलच्या जिभेवर असं येत नाही. त्याचे मित्र कधी कधी सिनेमाला जातात. कधी हॉटेलात जाऊन मिसळपाव खातात. परीक्षा संपल्यावर सीसीडीत जातात. अमोल त्यांच्याबरोबर नसतो. ते अमोलला बोलवत नाहीत. त्यांच्या ते लक्षातही येत नाही. ते कुणालाही बोलवत नाहीत. त्यांचं अचानकच ठरतं. 'ग्रुप' मध्ये बोलता बोलता.. अमोलला 'ग्रुप' नाही.
सकाळी उठल्यावर आवरून शाळेत जायचं. शाळा सुटल्यावर घरी यायचं, इकडे-तिकडे रेंगाळायचं नाही. घरी आल्यावर चहा-पाणी-टीव्ही-अभ्यास-जेवण-झोप. संपला दिवस! आता मात्र अमोल मोठा झालाय. दहावीत तो शाळेत पाचवा आला. पहिली चारही मुलं बोर्डात आली. अमोलला वाईट वाटलं नाही; त्याच्या आईला वाटलं- बाबांनाही वाटलं. अमोलनं अकरावी सायन्सला जाण्याचा निर्णय घेतला, नव्हे..ठरलेला निर्णय पाळला. अमोलला कंटाळा आला होता.
कंटाळा सगळ्यांनाच येतो. पण म्हणून आळशीपणा करून कसं चालेल?
हे 'चालेल' म्हणजे काय चालतं? तर शिक्षण, मग नोकरी, संसार वगैरे. आयुष्याची सफलता म्हणजे काय? अमोलच्या घरी विचारा.. उत्तर हेच मिळेल- अमोल ते आरशात बघत बडबडतो.
अमोलची गफलत एवढीच झाली की तो ते उत्तर दहावीपर्यंत मानत आला, पाळत आला. उगाचच!
मित्रांबरोबर चकाट्या पिटणे, टवाळक्या करणे, मुलींकडे बघणे- न्याहाळणे...या सगळ्या गोष्टी अस्तुत्य असतात. पण नववी दहावीतील मुलं सहसा हे मानत नाहीत. सभ्यतेच्या बाबतीत मन्या, तुष्या, अक्षा, अप्प्या यांचे विचार अमोलपेक्षा भिन्न आहेत, मात्र सरळ साधे आहेत.
कमीतकमी ढोंग करत जगणं म्हणजे सभ्यता.
अमोलला हे हळूहळू उमगू लागलं. तो शाळा सुटल्यावर रेंगाळू लागला होता. एकदा मित्रांबरोबर सिनेमाला जाऊन आला, आई-बाबांबरोबर नाही किंवा मामे-भावाबहिणींबरोबर नाही. तसा तो पूर्वी जात असे.
'हे सगळं खूप छान वाटतं' अमोलला वाटू लागलं होतं. दहावीत मात्र त्याचा नंबर खाली आला. पहिला तर जाऊच दे, अमोल थेट पाचवा आला. घरी धक्काच बसला. शाळेत शिक्षकांना धक्का बसला. अमोलला धक्का बसला नाही. गुण त्याला चांगलेच मिळाले होते, भाषेत तर उत्तम होते. त्यानं सायन्सला प्रवेश घेतला. ठसलेला निर्णय पाळला.
सायन्सची मुलं सहसा एवढा वेळ तिकडे फिरकत नाहीत. अमोल जाऊ लागला- कॉलेजच्या 'कल्चरल ग्रुप' मध्ये! तिथे तो काही गायक-अभिनेता नव्हता. लेखकही झाला नाही. त्याने पडद्यामागे राहणं पसंत केलं. अमोल आता बऱ्याच 'ग्रुप्स' मध्ये असतो. मूळ गरज तीच असते.
अमोलला आता सुरक्षित वाटतं.
माणसाला घोळक्यात आवडतं, त्याला एकेकट्याने असुरक्षित वाटतं.
अभ्यास घोळक्यात राहून होत नाही. प्रयत्न घोळक्यात रमून होत नाहीत. ते ज्याचे त्याने करायचे असतात. एकाग्रता लागते. अमोलचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. तो वाचनालयात तर जात असे, पण अभ्यासाची पुस्तकं त्याने फारशी वाचली नाहीत. बारावीचा निकाल लागला. सीईटीचाही लागला होता. इंजिनीअरिंग, मेडिकल शक्य नव्हतं. म्हणजे आता बीसीएस, डिप्लोमा वगैरे पर्याय होते.
...मात्र यावेळी अमोलनं ठरलेला निर्णय पाळला नाही. त्याने आर्टसला प्रवेश घेतला. तो अजूनही 'ग्रुप्स' टिकवून होता. त्याच्या घरी वाईट वाटत होतं. त्याला मात्र सुरक्षित वाटत होतं, ते महत्वाचं होतं.
***
खिडकी पलीकडल्या माणसानं काही कागदपत्रं दिली. प्रवेशाचं रीतसर काम पूर्ण झालं.
'अमोल रांगेतून बाजूला झाला होता'.
"Hi"
अचानक अमोलला हाक ऐकू आली. अमोलचा शाळेतला मित्र रोहन होता.
"तू इथे कसा काय?"
अमोलनं काहीतरी सुरुवात केली.
रोहन त्याच्या बहिणीच्या प्रवेशासाठी आला होता. नाहीतर तो 'इथे' कशाला येतोय? त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला आहे, तोही सरकारी कॉलेजमध्ये!
"तू एकदम आर्टसला वगैरे?
काय आयएएसचा प्लान आहे वाटतं!"
...जाता जाता रोहन बोलला. गाडी तिथेच लावून रोहन आत गेला.
"हुशार आहेस तू... म्हणजे सायन्सला गेलास की मेडिकल किंवा इंजिनीअरिंग, कॉमर्सला सीए वगैरे, आर्टसला युपीएससी, फार फार तर एम बी ए...
हुशार आहेस तू. तू अभ्यास करायचास.
सगळ्यांना तुझा हेवा वाटेल इतकं यश मिळवायचं.
कौतुक कमवायचं.
समुहात वेळ वाया जात असेल तर तू ते करायचं नाहीस.
तू स्तुत्य असंच वागायचं, ज्याला इतर लोक स्तुत्य म्हणतात तसंच!
लोकांनी तुझं कौतुक करायचं. तू विनम्रपणेच स्वीकार करायचास."
अमोलची प्रतिमा दिसत होती- रोहनच्या गाडीच्या आरशात. ती अमोलशी बोलत होती.
डोळे भरून आले. त्याने प्रवेशाच्या रांगेत उभ्या रोहनकडे पाहिलं. मग त्या साठ-सत्तरटक्केवाल्यांकडे. त्याला मनापासून हेवा वाटला त्यांचा.
पहिलं यावं, स्तुतिसुमने झेलावीत किंवा अगदी... चांगला पगार असावा, लोकांना हवंहवंसं वाटावं- सगळं अगदी 'हेवा' वाटण्यासारखंच असावं.. असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण गंमत अशी की हे ज्यांना मिळतं, मिळवता येतं त्यांनाही कुठल्यातरी दुसऱ्याच 'लेबलचा' हेवा वाटत असतो. आनंद उपभोगता येतो. तो आनंद म्हणजे काय, कशात मिळतो हे ठरवणं महाअवघड.
मग आम्ही माणसंच मनातल्या मनात वर्गीकरण करायला सुरुवात करतो. अर्थात, या वर्गीकरणाचा समाजवर्गांशी काहीही संबंध नाही. हे मनाचे खेळ असतात, सुरक्षित कोषात शिरण्यासाठी. हा हुशार, तो कष्टाळू, अमुक टवाळखोर, तमुक सभ्य, हा फसवा, तो नव्वदवाला, तो साठसत्तरवाला... अशी कित्येक लेबलं आम्ही चिकटवून टाकतो. आयुष्यभर हे असंच चालू राहतं. ही वर्गवारी एकप्रकारची सोय असते. पुढे पुढे ती अपरिहार्यता बनते. हे वर्गातल्या सगळ्यांनाच लागू, वरच्या आणि खालच्यासुद्धा!
आयुष्याच्या एखाद्या नाजूक वळणावर लक्षात येतं की आपणही कोणत्यातरी लेबलखाली, आपणच तयार केलेल्या 'सोशल इमेज' खाली, कुठल्यातरी वर्गात गणले जातो. पटावर आपलंही नाव आहे. काहीजण हे पाहून बुचकळ्यात पडतात. काही येनकेनप्रकारेण समाधानी असतात. काही दुर्लक्ष करतात. काही बंड करतात. काही जणांची असह्य घुसमट होते. असह्य आणि अपरिहार्य.
अमोल विचार करत होता. विचित्र गुंतागुंत भासत होती. मात्र थेट असे प्रश्न पडत नव्हते. उत्तरांची अपेक्षा नव्हती, उपयोगही नव्हता!
***** **** *** ** *
उजवीकडे पांढऱ्या फॉर्ममध्ये आपला ईमेल पत्ता आणि इच्छा असल्यास मोबाईल क्रमांक जरूर कळवा.. आणि ब्लॉगशी जोडलेले रहा! मला twitter वर देखील follow करू शकता.. www.twitter.com/shrikantwad
***** **** *** ** *
८ टिप्पण्या:
lajawaab..
@deepika
धन्यवाद :)
आत मनात साठलेलं आरशात दाखवलंत! मला अगदी ४५ वर्ष मागे घेऊन गेलात!
@श्रीधर जहागिरदार
आनंद वाटला.
katha khupach chhan vatali avadali!
@Dhanashri
धन्यवाद!
कथा एकदम मस्त आहे. खूप आवडली. माझंही असंच काहीसं झालंय. म्हणजे दहावीपर्यंत. ते दिवस आठवले.
@Sarojkumar
धन्यवाद!
कथेने कुठेतरी तुम्हाला तुमच्याशीच जोडले यात आनंद आहे.
मनमोकळेपणाने लिहा. आपली ओळख झाकावीशी वाटली तर Open-ID चा वापर करा.
भाषा आणि लिपी सुसंगत असू द्या. उदा. मराठीतून लिहिताना देवनागरी लिपी वापरा.
शक्यतो email पाठवू नका, मात्र त्याऐवजी comment जरूर लिहा- ते सोपे आणि सोयीस्कर आहे.